दुबई : वृत्तसंस्था
दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान शुक्रवारी डेमो फ्लाइटदरम्यान कोसळले असून या भीषण अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दुबई वेळेनुसार दुपारी २:१० वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा हादसा झाला. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली आणि परिसर काळ्या धुराने व्यापून गेला.
भारतीय हवाई दलाने वैमानिकाच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करताच एअर शो परिसरात शोककळा पसरली. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनेचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशी न्यायालयाची स्थापना केली आहे. हवाई दलाच्या तेजस विमानासंबंधी ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी २०२४ मध्ये राजस्थानातील पोखरण येथे युद्धाभ्यासादरम्यान इंजिन बिघाडामुळे एक तेजस विमान कोसळले होते.
दुबई एअर शो हे जगातील सर्वात महत्त्वाच्या विमान प्रदर्शनांपैकी एक असून, प्रमुख एरोस्पेस कंपन्या, विविध देशांची हवाई दलं आणि तंत्रज्ञान कंपन्या यात सहभागी होतात. १९८९ मध्ये सुरू झालेल्या या एअर शोमध्ये तेजसने तिसऱ्यांदा सहभाग नोंदवला होता.


