मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारा तणाव हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात स्पष्टपणे झळकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या काही अंतरावर उभे असतानाही नेहमी दिसणारी सहजता, संवाद आणि परस्परांतील जोड काही काळातच लोप पावल्याचे पाहायला मिळाले. दोघांची तणावपूर्ण देहबोली महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत देणारी ठरली.
भाजपच्या प्रदेश नेतृत्वातील बदलांच्या चर्चेमुळे आणि शिंदे–रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेदाने महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेतील घडामोडींवरून चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले जात असताना, एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजीचा सविस्तर पाढा मांडल्याचे समजते. मात्र शाह यांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले, पण ठोस आश्वासन न दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दिल्ली दौऱ्यानंतर वातावरण शांत होईल अशी अपेक्षा होती; मात्र दुसऱ्याच दिवशी बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस आणि शिंदे यांनी स्वतंत्र प्रवास केला. सोहळ्यात दोघे जवळपास एकत्र दिसले नाहीत, संवाद तर झाला नाहीच. विशेष म्हणजे फडणवीस आणि अजित पवार हे मात्र एकत्र दिसल्याने शिंदे यांच्या नाराजीला आणखी खतपाणी मिळाल्याचे म्हणणे आहे.
मुंबईत परतल्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही. हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात फडणवीस–शिंदे आमनेसामने आले तरी औपचारिक नमस्काराव्यतिरिक्त कोणताही संवाद झाला नाही. दोघांच्या देहबोलीतून ताण स्पष्ट जाणवत होता. नजर चुकवणे, अंतर राखणे आणि औपचारिक वर्तन यामुळे महायुतीत वाढणारा तणाव सर्वांसमोर उघडा पडला. या सर्व घडामोडींकडे पाहता, शिंदे–फडणवीस यांच्यातील नात्यातील दरी वाढत असून महायुतीतील सत्तासमीकरणांवर याचा पुढील काळात मोठा परिणाम होऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


