जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की त्यांच्या घातपाताच्या कटामागे धनंजय मुंडेच मुख्य सूत्रधार आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी स्वतःला देण्यात आलेले पोलिस संरक्षण नाकारण्याचा निर्णय घेत, ते तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यांच्या वतीने सहकारी किशोर मरकड यांनी आज जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला.
अर्जात जरांगे यांनी नमूद केले आहे की त्यांच्या जीवावर झालेल्या कटाचे सूत्रधार मुंडे आहेत आणि सरकार त्यांचे संरक्षण करत आहे. त्यामुळे सध्या दिलेले सुरक्षा कवच हटवण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी अडीच कोटी रुपयांत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड आणि गेवराई येथून काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक जण जरांगे यांचा जुना सहकारी असल्याची माहिती आहे. तक्रार मिळताच पोलिस अधीक्षकांनी तपासात तातडीने लक्ष घातले होते. जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना, “माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. तपासात सर्व स्पष्ट होईल,” असे सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.


