जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मानराज पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवत एका वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच सत्य लक्षात आल्यानंतर वृद्धाने त्या दोघांचा शोध घेऊन अंगठी परत मिळवली. संतप्त नागरिकांनी या दोघांना चोप देत रामानंद नगर पोलिसांच्या हवाली केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मानराज पार्कजवळ राहणाऱ्या वृद्धाला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन जण साधूच्या वेशात भेटले. त्यांनी धर्म, दानधर्माच्या नावाखाली वृद्धाला बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखी करत बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. थो़ड्याच वेळात अंगठी गायब असल्याचा प्रकार वृद्धाच्या लक्षात आला आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेतला. दोघे साधू सापडताच वृद्धाने अंगठी परत मिळवली. मात्र प्रकार समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी या दोघांना बेदम धोपटले. माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस घटनास्थळी दाखल होत जमावाच्या तावडीतून दोघांना सुखरूप पोलीस ठाण्यात घेऊन गेले. चौकशीत या दोघांनी वृद्धाची अंगठी गायब करण्यापूर्वी कोणीतरी त्यांना दक्षणा म्हणून अर्धा किलो बदाम आणि पाचशे रुपये दिल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी कळवले.


