मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या नाराजीनाट्याचा आज पुन्हा एकदा पहावयास मिळाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार होते. पण शिंदेंनी ऐनवेळी या कार्यक्रमापासून अंतर राखले. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिंदे गटातील धुसफूस कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. पण शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप करत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे हजर होते. पण फडणवीसांनी शिंदेंपुढेच त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली. शिवसेनेनेच उल्हासनगरमधून आमचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीमधील घटकपक्षांना एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यापासून दूर राहण्याचेही निर्देश दिले. त्यामुळे शिंदे गटाच्या नाराजीवर पडदा पडल्याचा दावा केला जात होता.
पण आज पुन्हा शिवसेनेच्या नाराजीनाट्याचा दुसरा अंक पहावयास मिळाला. राज्याच्या पोलिस विभागाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला फडणवीस यांच्यासह अजित पवार व एकनाथ शिंदे हे त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार होते. या तिघांचेही या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव होते. पण शिंदे यांनी ऐनवेळी या कार्यक्रमाला दांडी मारली. ते या कार्यक्रमाला का आले नाही? हे त्यांच्या पक्षाने अद्याप स्पष्ट केले नाही. पण राजकीय वर्तुळात शिंदे कालच्या घटनाक्रमामुळे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेनी राज्य पोलिसांच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे त्याचे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी सातत्याने फोडले जात आहेत. शिवसेनेला अडचणीचे ठरतील असे अनेक पक्षप्रवेश भाजपकडून राज्यात होत आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे व त्यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
हा घटनाक्रम एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे भाजपनेच त्यांनाच गळाला लावल्यामुळे शिंदे गट भाजपवर प्रचंड नाराज झाला आहे. त्यांची नाराजी कालच्या कॅबिनेट बैठकीतही दिसून आले. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन भाजपकडून फोडण्यात येणाऱ्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुद्यावर जाब विचारला. आता हे प्रकरण पुढील काही दिवस असेच तापण्याची शक्यता आहे.


