जळगाव : प्रतिनिधी
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तराखंड आणि जळगावातील पोलिस वसाहतीमध्ये घडला. पीडिता पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेची मुलगी आहे. याप्रकरणी सोमवारी (१७ नोव्हेंबर) मध्यरात्री गोधरा हरिपूर, जि. नैनीताल, उत्तराखंड येथील रहिवासी सावत्र वडिलांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस दलात कार्यरत महिला कर्मचारी मुलीसह पोलिस वसाहतीमध्ये राहते. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर विवाह जुळविणाऱ्या वेबासाइटवरून परिचय झाल्याने तीन वर्षांपूर्वी उत्तराखंड येथील इसमासोबत पुनर्विवाह झाला. सन २०२४मध्ये दिवाळीची सुटी घालविण्यासाठी सदर महिला पोलिस व तिची १५ वर्षीय मुलगी उत्तराखंड येथे गेली होती. तेथे १५ दिवसांच्या वास्तव्यादरम्यान मुलीचे सावत्र बापाने आक्षेपार्ह व्हिडीओ करीत मुलीलाच पाठविला. त्यानंतर नराधमाने तिच्यावर जळगाव व उत्तराखंड येथे अत्याचार केला.
पीडितेच्या आईने सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांना सोबत घेऊन सोमवारी रात्री जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. पीडितेसह तिच्यासोबत आलेल्या महिलेला तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे हे पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहाटे तीन वाजता सावत्र बापाविरूद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


