जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दिनकर नगरातील रहिवासी हर्षल प्रदीप भावसार (वय ३१) या तरुणाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री दीड वाजता जळगाव ते भादली रेल्वे रुळावर आढळून आला. तर तरुणाची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेजवळ मिळून आली. तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणासोबत घातपात झाल्याचा आरोप केला. तरुणाला मारुन त्याचा मृतदेह रुळावर टाकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दीनकर नगरात हर्षल भावसार हा तरुण वास्तव्यास होता. एमआयडीसीतील एका कंपनीत काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने घरी आईला भाजी आणून दिली व स्वयंपाक करून ठेव असे सांगून तो घराबाहेर पडला. परंतू रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. या दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे खांबा क्रमांक ४२३ जवळील रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्या वेळी पोहेकॉ प्रदीप राजपूत, प्रकाश चिचोरे हे घटनास्थळी पोहचले त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.
सुरुवातीला तरुणाची ओळख पटत नसलयाने पोलिसांनी मयत तरुणाची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात पाकीट आणि आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन पोलिसांनी मयत हर्षल भावसार याची ओळख पटवली आणि घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. तरुणाचा मृतदेह बायपासनजीकच्या रेल्वे रुळाजवळ सापडला तर त्याची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेनजीक आढळली. हर्षल याच्यासोबत घातपात झाला असून त्याला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचा आरोप त्याचे मामा मयूर भावसार यांनी केला. रेल्वे रुळावर संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून लागलीच तपासचक्रे फिरविण्यात आली. त्यांनी वाद झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर ताब्यात घेतला. त्यानंतर हर्षलचे ज्यासोबत वाद झाला होता, त्या दोघांना पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.


