चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच आज शहरात शक्तीप्रदर्शनाच्या जोरदार वातावरणात भव्य रॅली व जाहीर सभा पार पडली. तसेच नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेसाठीच्या ३६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर आयोजित या सभेला माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातून निघालेल्या ढोल-ताशांच्या गजरातील रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
दरम्यान, प्रतिभा चव्हाण यांनी नामांकनापूर्वी शिवनेरी निवासस्थानी कुलदैवताचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत जगनाडे महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि वीर भाई कोतवाल यांच्या स्मारकांना अभिवादन केले. नव्या जबाबदारीसाठी या महान व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ताकद दाखवत दिलेला हा उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रम शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


