पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय तणाव अनेकदा उघडपणे दिसला. दोन्ही बाजूंनी स्वतंत्र भूमिका घेत राज्यभर संघर्षाचे चित्र निर्माण होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये मात्र अनपेक्षित घडामोड घडली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एका उमेदवाराच्या मागे एकत्र उभे राहिल्याने संपूर्ण राज्यात याची चर्चा सुरु झाली आहे.
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या मनिषा गोरे यांनी अर्ज दाखल करताना, ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही गटांनी घेतलेल्या सहकार्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की, दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली मोठी निवडणूक होत आहे. त्यांच्या योगदानाचा आदर म्हणून त्यांच्या पत्नी मनिषा गोरे यांना दोन्ही बाजूंनी पाठिंबा देण्यात आला. हा निर्णय भावनिक व स्थानिक श्रद्धेचा भाग असून राजकीय युती नाही, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनीही स्थानिक निवडणुकांतील निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा निर्णय चाकणपुरताच मर्यादित असून तालुक्यातील इतर ठिकाणी दोन्ही गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत.
चाकणमधील या सहकार्याची चर्चा सुरू असतानाच मुंबईतील शिंदे गटात मात्र नाराजी वाढली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीत काही नगरसेवक आणि इच्छुक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. काही आमदारांकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना तिकीट देण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप नगरसेवकांनी केले. त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे निर्माण होत असून काही विभागांत नाराजी वाढत असल्याची माहितीही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना स्पष्ट इशारा दिला. पक्षात सामील झालेले नगरसेवक आणि स्थानिक नेते हे आपल्या विश्वासावर आले असून त्यांना योग्य मान-सन्मान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या लोकांना तिकीट मिळवून देण्यासाठी दबाव टाकणे अथवा इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. “पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना मान देणं गरजेचं आहे,” असा संदेश देत त्यांनी मुंबईत निवडणूक मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले.


