बीड : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.
अजित पवारांच्या पक्षाची साथ सोडण्यामागील कारणे सांगताना योगेश क्षीरसागर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. “राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मात्र मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे,” असे ते म्हणाले. या विधानामुळे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहोत.” दरम्यान, योगेश क्षीरसागर हे आता कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुती झाली नाही, तर योगेश क्षीरसागर हे आमदार बंधू संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात राजकीय मैदानात दिसण्याची शक्यता आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने योगेश क्षीरसागर यांनी वेळ न दवडता भाजप प्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या कुटुंबाची बीड नगरपालिकेवर दीर्घकालीन पकड राहिलेली असून त्यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता येथे जवळपास निर्विवाद मानली जाते. त्यामुळे योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे बीडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो. नगरपालिका निवडणूक जवळ येत असताना झालेल्या या प्रवेशामुळे बीडमधील राजकारणात नवीनच चुरस निर्माण झाली आहे.


