धुळे : वृत्तसंस्था
खान्देशातील धुळे जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पती व सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिवाळीला माहेरी आल्यावरही हसतखेळत सामान्य दिसणाऱ्या गायत्री पाटील यांनी सासरी गेल्यानंतर सततच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकुंभे शिवार येथे रहाणारी गायत्री आनंदा पाटील (वय अंदाजे ३०) यांनी गुरुवारी रात्री आपल्या ५ वर्षांच्या दुर्गा आणि ३ वर्षांच्या दुर्गेश या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. रात्री साडेअकराच्या सुमारास घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामस्थांत शोककळा पसरली. आई व दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ गणेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुर शंकर पाटील आणि सासू वेनुबाई पाटील या तिघांविरोधात छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोनगीर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित तिन्ही आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
गायत्री आणि गणेश यांच्यात भावा-बहिणीचे अतूट नाते होते. तीन बहिणींमध्ये एकुलता भाऊ असलेल्या गणेशला पोलिस बनताना पाहणे, हे गायत्रीचे मोठे स्वप्न होते. यासाठी गणेश सराव आणि तयारी करत असतानाच बहिणीने अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


