मुंबई : वृत्तसंस्था
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले विधान लक्षवेधी ठरले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेवर विजय मिळवणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
अलीकडेच त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसले. त्यानंतर दोन्ही पक्षांत युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
या चर्चेबाबत खैरे म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा परिणाम दिसेल. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, हे कोणीही नाकारू शकत नाही.” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची आठवण करून देत मुंबईचे राजकारण मराठी नेतृत्वाच्या आधारावर उभे असल्याचे सांगितले. खैरे यांनी काँग्रेसवर टीका करत आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत तडजोड करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. “वेगवेगळे लढल्यास भाजपा पुन्हा वरचढ ठरेल, त्यामुळे काही ठिकाणी तडजोड आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. खैरे यांच्या या वक्तव्याने महापालिका निवडणुकीपूर्वी नवी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.


