मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारने महिलांना वाटलेल्या प्रत्येकी 10 हजार रुपयांमुळेच एनडीचे बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाही. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे? विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील, असे ते म्हणाले.
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतो की स्वतंत्र लढत आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण कसे लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तिथे महायुती निवडून येईल यात शंका नाही. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे ते म्हणाले.


