मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
याशिवाय शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
सुट्टीच्या दिवशीही सकाळी ११.०० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवारांना दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागद पत्रासह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करता येतील. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला


