नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११.२० वाजता भीषण स्फोट होऊन परिसर हादरला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी बहुसंख्यजण पोलिस कर्मचारी असून त्यांच्यावर ९२ आर्मी बेस हॉस्पिटल आणि एसकेआयएमएस सौरा येथे उपचार सुरू आहेत.
हा स्फोट व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणातील जप्त स्फोटकांचे नमुने तपासत असताना झाला. हरियाणातील फरीदाबाद येथे अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून सुमारे ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. त्यातील एक भाग नौगाम पोलिस स्टेशनमध्ये तपासासाठी ठेवण्यात आला होता. मात्र संपूर्ण ३६० किलो स्फोटके पोलिस स्टेशनमध्ये साठवली होती की नाही, याची अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आय२० कारमध्ये झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. हीच कारवाई पुढे नेताना उलगडलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलवर (ITM) पोलिसांचा तपास केंद्रित होता. या प्रकरणातील पहिला एफआयआर नौगाम पोलिस ठाण्यातच नोंदवण्यात आला होता.
तपासादरम्यान बनपोरा (नौगाम) परिसरात ऑक्टोबरमध्ये पोलिस व सुरक्षा दलांना धमकावणारे पोस्टर्स आढळले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरिफ निसार दार उर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ शाहिद या तिघांना अटक केली. चौकशीत मौलवी इरफान अहमद या माजी पॅरामेडिक-इमामचे नाव समोर आले. त्याच्यावर डॉक्टरांना कट्टरतावादासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे.
तपासाचा धागा पुढे सरकत असताना, पोलिसांनी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात कारवाई करत डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक केली. त्यांच्याकडून २,९०० किलो आयईडी निर्मितीचे साहित्य — अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर सायनाइड इत्यादी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.


