धरणगाव : प्रतिनिधी
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपरिषदेतील निवडणुकीचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
दि. १० नोव्हेंबरपासून नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अर्ज विक्रीस सुरुवात करण्यात आली. आज तिसऱ्या दिवशी अर्ज विक्रीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी तब्बल १८८ अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत १३ अर्ज विक्री झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
धरणगावमध्ये प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असून प्रचारयंत्रणा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनाही या निवडणुकीत सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या नावांबाबत अधिक हालचाली अपेक्षित आहेत.


