जळगाव : प्रतिनिधी
अवैध धंदे चालकांकडून एकापाठोपाठ करण्यात आलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांनंतर उपद्रवींवर कारवाई करण्यासाठी पोलिस दलातर्फे विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच दिल्लीतील स्फोटानंतर दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. जळगाव उपविभागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री ठिकठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यात २५ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक, मोटार वाहन कायद्यांतर्गत तसेच अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. शांतताभंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे.
अवैध दारू अड्यांवर गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या बंदोबस्तात तपासणी मोहीम, नाकाबंदी आदी मोहिमा राबविण्यात येत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांसह क्यूआरटी व आरएसपीच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत एमआयडीसी, जिल्हापेठ, शनिपेठ, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष ऑपरेशन राबविण्यात आले.
या ऑपरेशनमध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक तर ४ जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झाली. शिवाजीनगर रस्त्यावर भिंतीलगत एक जण देशी दारूची अवैध विक्री करीत होता. त्याच्यावर कारवाई करून ५६० रुपयांची दारू जप्त केली. दूध फेडरेशनजवळ विकास बियर शॉपीमध्ये विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यावर पथकाने छापा टाकला. त्याच्याकडून १६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


