पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता तुळजापूर शहरात झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाला, त्यामुळे विरोधकांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणे होय. त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं की, लोकशाही व्यवस्थेत पक्ष वाढविण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण गुन्हेगारांना आसरा देणे ही जबाबदार राजकारणाची पद्धत नाही. सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय नाही, असा हवा
सुळे यांनी ड्रग्जविरोधी मोहिमेचं महत्त्व अधोरेखित करत सरकारने यावर ठोस भूमिका घ्यावी, असंही सांगितलं. महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही, असा संदेश सरकारकडून गेला पाहिजे, असं सुळे म्हणाल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे तुळजापूरसह राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांकडून भाजपवर गुन्हेगारांना राजकीय आसरा दिल्याचे आरोप होत असून, आता मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्रिया सुळे यांनी लिहिलेले पत्र देखील पहा….
प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई
विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,
तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल.
आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.
तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.
धन्यवाद.
सुप्रिया सुळे
खासदार, बारामती लोकसभा


