नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून, सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
संध्याकाळी लाल किल्ला क्रॉसिंगजवळ एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २० जण जखमी झाले आहेत. काही वाहने जळून खाक झाली आहेत. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, देशभरातील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाल करत जिल्हा पातळीवरील सर्व युनिट कमांडर आणि शहरांच्या पोलिस आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल यांसारख्या प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) गस्त वाढवली आहे.
संशयास्पद वस्तू ओळखण्यासाठी श्वान पथके, बॉम्ब शोधक आणि निकामी पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांना सावधगिरीने प्रवास करण्याचे, अज्ञात वस्तूंना हात न लावण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि वसईसह पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
स्फोटाचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी, तपास यंत्रणा सर्व शक्यता तपासत आहे. दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.


