मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या अडचणीत आले होते आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. तुम्हाला सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण यावेळी तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोडवू शकत नाहीत. मी तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असे त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले आहे. यावेळी त्यांनी उद्या सकाळी 10 वा. मोठा गौप्यस्फोट करण्याचीही घोषणा केली.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही नियुक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी हायकोर्टाकडे अपिल करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह घोटाळा, जरंगेश्वर घोटाळ्याच्या सर्व फाईल्स हळूहळू बाहेर काढणार आहे. सिंचन घोटाळ्यातून तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले आहे. पण यापुढील कोणत्याही घोटाळ्यातून तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुम्हाला सोडवू शकत नाही. मी कोर्टाकडून ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. अंजली दमानिया यांनी यावेळी अजित पवारांचे नाव घेतले नाही. पण त्यांचा बोलण्याचा रोख त्यांच्याकडेच होता.
आत्ताच्या घटकेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सरकारने जे 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याची नोटीस काढली आहे, ही नोटीसच मुळात चुकीची आहे. हा अधिकार महसूल विभागाकडे नाही. यासंबंधीचा कोणताही आदेश सिव्हिल कोर्टच देऊ शकते. त्यामुळे आत्ता जे सांगितले जात आहे की, चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही. हा व्यवहार रद्द झाला आणि हा विषय संपला, असे बिल्कुल नाही. या सर्व गोष्टींचा एक प्रचंड मोठा खुलासा मी उद्या सकाळी 10 वा. करणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.
सरकारने या घोटाळ्याप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. पण अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरही सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी FIR झाला, पण त्यातही scam? पार्थ अजित पवारचे नाव नाही आणि कंपनीचे पण नाव नाही? का? ह्यातून सुद्धा वाचवण्याची तयारी? बास करा राजकारण. चौकशी करा आणि शिक्षा द्या. ह्या वेळी जी समिती स्थापन होईल, त्यात फक्त शासकीय अधिकारी नाही, जनतेतून सुद्धा प्रतिनिधी हवेत. मी हे प्रतिनिधित्व करायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या.
दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या ‘अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी’ या कंपनीने मुंढव्यातील ही जमीन मे महिन्यात खरेदी केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे भागीदार आहेत. या व्यवहाराचा दस्त नोंदविताना अनियमितता झाली असल्याचे यापूर्वीच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यावरून विभागाकडून 30 ऑक्टोबर रोजी कंपनीला नोटीस बजाविण्यात आली, अशी माहिती नोंदणी विभागातर्फे देण्यात आली. सरकारच्या मालकीची जागा असल्यामुळे रेडीरेकनरमधील जमिनीच्या दराच्या पन्नास टक्के म्हणजे 146 कोटी रुपयांचा नजराणा भरणे बंधनकारक आहे. तो देखील संबंधित कंपनीने भरलेला नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


