जळगाव : प्रतिनिधी
मित्रांसोबत व्हीडीओ काढतांना मध्ये येत असल्याने एका बाजूला व्हा असे म्हटल्याचा राग आल्याने चौघांनी प्रियांशूसिंग विद्यासागरसिंग राजपूत (वय २७, रा. हरिविठ्ठल नगर, आत्महत्या कॉलनी) यांना शिवीगाळ करीत डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया चिडीया घरजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील हरिविठ्ठल नगरातील आत्महत्या कॉलनीत प्रियांशूसिंग राजपूत हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास मित्रांसोबत मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया चिडीया घर येथे व्हिडीओ काढत असतांना संशयित अभय गुजर हा व्हिडीओ मध्ये येत होता. यावेळी प्रियांशूसिंग राजपूत याने तु एका बाजूला व्हाव असे बोलला. त्याचा राग आल्याने अभय गुजर याच्यासोबत असलेल्या अनोळखी तिघांनी प्रियांशूसिंग व त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अभय गुजर याने प्रियांशूसिंग याच्या डोक्यात दगड टाकून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अभय गुजर याच्यासह अनोळखी तिघ साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनोज घुले करीत आहे.


