मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्वतः दमानिया यांनीच या घटनेचा खुलासा करत सांगितले की, काही विश्वसनीय सूत्रांकडून त्यांना ‘तुमचा गेम केला जाणार’ असा इशारा देण्यात आला आहे.
दमानिया यांनी सांगितले की, “मी अमेरिकेत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या हातात काही इनपुट आले आहेत. काही लोक चर्चा करत आहेत की ‘यांचा गेम करायचाच’. त्यामुळे तुम्ही सावध राहा,” असा इशारा त्यांनी दिला. संबंधित अधिकारी अतिशय वरिष्ठ पातळीवरील असून, त्यांनी धमकीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या, “मला सांगण्यात आले की, धमकी देणारे लोक ‘सेकंड रँक’चे आहेत. तुम्ही काळजी घ्या, प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, फोन स्विच ऑफ ठेवा,” असा सल्ला मला देण्यात आला.
धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, “त्या लोकांविषयी मला काहीच माहिती नाही. पण मला फोन अतिशय खात्रीलायक व सीनियर लेव्हलवरून आला होता. आणि स्पष्ट सांगण्यात आले की ‘यांचे आता अती होत आहे, यांचा आता गेम करायचा’.” या धमकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती देण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. दमानिया यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला की, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली, त्या फोनच्या आदल्या दिवशीच त्यांना स्वतःला हा इशारा मिळाला होता. त्यामुळे या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घटनांनंतरही अंजली दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. “मला सिक्युरिटी घ्यायला सांगण्यात आले, पण मी दोन वेळा लिहून दिलं आहे की मला सुरक्षा नको आहे. मी माझं सामाजिक काम सुरू ठेवणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


