मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात महायुतीत फुट पडत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी ‘कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल, तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला उदय सामंत यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल, तर आम्ही तयार आहोत,’ असे थेट आव्हान त्यांनी दिल्याने, भाजप आणि शिंदे गट यांच्यातील स्थानिक पातळीवरील तणाव आता सार्वजनिकरित्या समोर आला आहे.
उदय सामंत म्हणाले होते, महाराष्ट्रात एवढे कुणी बोलत नसेल तेवढे तुमच्या तालुक्यात बोलत आहेत. आम्ही स्वबळावर लढू, आमच्याकडे इतक्या संस्था आहेत, आमच्याकडे इतके कार्यकर्ते आहेत अशी भाषा केली जाते. आपल्याला महायुतीतूनच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला जर खुमखुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतोय हे दाखवण्याची तयारीही आमची आहे. शिवसेनेला डिवचण्याचं काम जर कुणी करत असेल तर शिवसेना काय आहे हे सांगण्याचे काम आमचे आहे.
नितेश राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले. त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये. कुणी आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये. कुणाला खुमखुमी काढायची असेल, मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत.


