जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिलखेडे येथील रहिवासी शुभम प्रभुदास भालेराव (वय २४) याचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना, रविवार, ९ रोजी घडली. शुभम आपल्या कुटुंबातील तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, पण ज्या घरात एका महिन्यानंतर दुसऱ्या बहिणीचे लग्न होणार होते, त्या घरात आता भयाण शांतता आणि दुःख दाटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभमच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी आहेत. शनिवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शुभम आपल्या मित्रांसोबत गावातील गिरणा नदीत गेला होता. पोहत असताना, तो मुख्य धारेत अडकून नदीत बुडाला. शुभम वाहून गेल्याचे समजताच गावातील आणि परिसरातील नागरिकांनी पिलखेडेपासून ते रामेश्वरपर्यंत त्याचा रात्रभर कसून शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर, रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिलखेडे येथील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. शुभमच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार गेला आहे.


