मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमीच विविध विषयांमुळे खळबळ उडत असते. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात 2 संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे मातोश्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तसेच भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.
नेमंक काय घडलं?
मुंबईच्या बांद्रा मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या आसपास दोन संशयास्पद ड्रोन उडताना दिसले होते. यामुळे नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाली होती. हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याने, ड्रोन नेमका कोणी उडवला? यामागे हेतू काय होता? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले होते. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, मुंबई पोलिसांनी या संशयास्पद घटनेचा अधिकृत खुलासा केला आहे.
पोलिसांचा खुलासा
मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे ड्रोन कोणीही संशयास्पद हेतूने उडवले नव्हते. एमएमआरडीएने (MMRDA) पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी खेरवाडी आणि बीकेसी (BKC) परिसरात ड्रोन उडवण्याची अधिकृत परवानगी घेतली होती. हे ड्रोन याच सर्वेक्षणाचा भाग म्हणून उडवण्यात आले होते, त्यामुळे ‘मातोश्री’च्या सुरक्षिततेला कोणताही धोका नव्हता. मुंबई पोलिसांच्या स्पष्टीकरणामुळे ‘मातोश्री’वरील ‘ड्रोन’ रहस्यावरील पडदा हटला असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.


