फैजपूर : प्रतिनिधी
फैजपूर शहरात आज दि.९ नोव्हेंबर रोजी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सामीलच्या समोर, सावदा रोडवर असलेल्या राज लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉलला ही आग लागली असून, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली असून, पोलिसांनी सुरक्षा व रहदारी नियंत्रणासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.


