जळगाव : प्रतिनिधी
बोलण्यात गुंतवून ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून साहेबराव ओंकार पाटील (८९, रा. राधाकृष्ण नगर) यांच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. ही घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राधाकृष्ण नगरातील गजानन साहेबराव पाटील हे त्यांचे वडील साहेबराव ओंकार पाटील यांच्या बँक खात्याचे एटीएम कार्ड घेऊन स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. अनेकदा प्रयत्न करूनही रक्कम निघत नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्डची अदलाबदल केली. गजानना पाटील यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कार्ड ब्लॉक झाल्याचे स्क्रीनवर दिसले. रात्री त्यांनी वडिलांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, २८ हजार रुपये काढल्याचे दिसले.
एटीएम कार्ड बदलवून २८ हजार रुपये काढल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन पाटील हे बँकेमध्ये तपास करण्यासाठी गेले त्या वेळी तेथे आणखी एकजण अशीच चौकशी करत होता. त्याचेही एटीएम कार्ड बदलवून १७ हजार रुपये काढल्याचे संबंधित व्यक्ती बँक अधिकाऱ्यांना सांगत होता. मात्र याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.


