मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार भूखंड प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “या प्रकरणात कुणालाही वाचवले जाणार नाही; जे दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल,” असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात आधीच काहींवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. भविष्यात कुणाचा सहभाग आढळल्यास त्यावरही कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी १,८०० कोटींची जमीन अवघ्या ३०० कोटींना घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल महिनाभरात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
शरद पवारांनी “पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही, हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा” असे म्हणत सरकारला अडचणीत आणले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “एफआयआरमध्ये फक्त सिग्नेटरीज, व्हेंडर्स आणि अधिकृत मान्यता देणाऱ्यांवरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार पार पडत आहे.” या विधानामुळे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा ठाम संदेश फडणवीस यांनी दिला आहे.


