जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८, रा. रामेश्वर कॉलनी) असून ते मजुरीचे काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा मृतदेह मेहरुण तलावात तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न करत मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शासकीय प्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रकाश कांबळे यांना मयत घोषित केले. प्रकाश कांबळे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.


