जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असताना आता मुक्ताईनगर जवळील बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिराजवळील वळणावर लक्झरी बस आणि बल्करची धडक झाली. त्यात बल्कर चालक जागीच ठार झाला, तर बसचालक गंभीर जखमी झाला. ५ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेत २८ प्रवासी बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी लक्झरी बस (क्र.एमपी.०९-एफए ९७१०) अकोटवरून इंदूरकडे जात होती. यावेळी सिमेंटचे बल्कर (क्र.एमएच.४६-सीयू.८१ ५४) हे खामखेडा जवळ बी.एन. अग्रवाल यांच्या रस्त्याच्या कामावरून सिमेंट खाली करून धुळ्याकडे जात होते. मुक्ताईनगर जवळील महादेव मंदिरासमोरील वळणावर लक्झरी व बल्करची समोरासमोर धडक झाली. त्यात बल्कर चालक प्रमोद जग्गेभान पटेल (वय २३, रा. पुनिया खुर्द, मंगवा, मध्य प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तर खासगी बसचालक सलीम शहा (वय ३५, रा. आकोट) यांच्या डोक्याला जबर मार लागला. ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर जळगावला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन प्रवासी किरकोळ जखमी बल्करने धडक दिलेल्या खासगी बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. बसमधील मुबारक शेख अमीर शेख (वय ४७, रा. इंदूर), शहजाद खान अदीउल्ला खान (वय ३५, रा.आकोट) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले. बस शिरली वेफर्सच्या दुकानात अपघात झाला, त्या वळणावरील महादेव मंदिराजवळ मेळसांगवे येथील शरद पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केळी वेफर्स विक्रीचे दुकाने टाकले आहे. अपघातग्रस्त बस या दुकानाच्या शेडमध्ये शिरल्याने नुकसान झाले. कोणी हजर नसल्याने जीवितहानी टळली.


