जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मोहन नगरातील नूतन वर्षा कॉलनीत घरातील फ्रिजसह गॅस सिलींडरला आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहन नगरातील नूतन वर्षा कॉलनीत रविंद्र सुखदेव सपकाळे हे वास्तव्यास आहे. गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रिजला आग लागली. काही वेळाताच आगीने रौद्ररुप धारण करीत घरातील संपुर्ण साहित्य आगीच्या विळख्यात घेतले. या आगीने स्वयंपाक घरातील गॅस सिलींडरपर्यंत पोहचल्यानंतर आग आणखीच भडकली. आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला मिळताच पथकातील संतोष तायडे, रोहीदास चौधरी, वृक्षभ सुरवाडे, तेजस बडगुजर, गणेश महाजन, महेश पाटील, भूषण पाटील, सत्तार तडवी, विशाल पाटील, गौरव पाटील यांनी आगीवर पाण्याचा मारा करीत नियंत्रण मिळवले.
या आगीच्या घटनेत घरातील गॅस सिलींडरने देखील पेट घेतला. परंतू अग्निशमन विभागाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे घरात तीन गॅस सिलींडर बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.


