धरणगाव : विजय पाटील
नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व पक्ष, उमेदवार आणि मतदार विकासाभिमुख नेतृत्व निवडण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहराच्या सर्व ११ प्रभागांमध्ये तयारीचा जोर असून, तरुण मतदारांचा सहभाग या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा कल या वेळी स्थिर, पारदर्शक आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांकडे आहे. नागरिकांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि नव्या गुंतवणुकीसाठीचे प्रयत्न या मुद्यांवर चर्चा रंगत आहे.
तरुण मतदार सोशल मीडियाद्वारे प्रचारात सक्रीय दिसत असून, “या वेळी पक्ष नव्हे, तर काम करणाऱ्यांना संधी” असे मत व्यक्त केले जात आहे. महिला मतदारसंघातही चांगला उत्साह असून, महिलांच्या विकास, सुरक्षा आणि रोजगार निर्मितीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
निवडणुकीकडे पाहता धरणगाव शहरात शांत, सुजाण आणि सकारात्मक प्रचाराची हवा जाणवते आहे. स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढून शहराला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


