हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ही बस तंदूरहून हैदराबादकडे जात होती. बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. हे विद्यार्थी रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते व कॉलेजसाठी हैदराबादला परत येत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकचा चालक नियंत्रण गमावल्याने त्याने बसला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बसचे मोठे नुकसान झाले. डंपरवर भरलेली खडी बसच्या समोरील भागात कोसळली, ज्यामुळे अनेक प्रवासी आत अडकले. घटनेची माहिती मिळताच चेवेल्ला पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खडीखाली गाडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे हैदराबाद-विजापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पोलिसांनी वाहतूक वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले असून, अपघातातील जखमींना तातडीने हैदराबादला हलवून योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेची संपूर्ण माहिती तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.


