यावल : प्रतिनिधी
आमोदा मोर नदी पुलाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. केळी मजूर घेऊन जाणारी ट्रक उलटल्याने २५ मजूर जखमी झाले. हा अपघात सकाळी ८.३० वाजता झाला. दरम्यान अपघात स्थळी उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलस्वारांनाही खासगी बसने धडकल्याने तिघे जखमी झाले. या रविवारी सावदा येथून जामनेर येथे केळी कापणीसाठी आयशर ट्रकने (एमएच ४३ वाय ५०७४) ३० ते ४० मजूर जात होते. आमोदा मोर नदीच्या अलीकडील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. शैलेंद्र खाचणे यांनी उपचार केले. रुग्णालयात जखमींच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी उभ्या दोन मोटरसायकलस्वारांना खासगी बसने धडक दिली. या अपघातात आमोदा येथील युगल पाटील, बामणोदचे वासुदेव फेगडे आणि सावदा येथील ईश्वर बडगे हे तिघे जखमी झाले. मोटरसायकलींचे नुकसान झाले
जखमी मजुरांमध्ये सलीम तडवी (हिंगोणा), हुसेन तडवी (सावदा), संजय पाटील (रोजोदा), फिरोज तडवी (सावखेडा), पवन मेढे (रोझोदा), फकीरा तडवी (खिरोदा), राजू तडवी (रोझोदा), साहिल तडवी (निंभोरा), हसन तडवी (हिंगोणा), आसिफ पिंजारी (हिंगोणा), भास्कर मेढे (रोझोदा), शाबीद तडवी (हिंगोणा), साबीर तडवी (हिंगोणा), सुरेश आटकाडे, संजय अटकाडे (रोझोदा), चंद्रकांत तायडे (रोझोदा), आशा पाटील (रोझोदा), देवराज लहासे (भोकरी), अमित तडवी (हिंगोणा), सरला तायडे (रोझोदा), पिंटू तायडे (गाते), महेंद्र तायडे (कोचूर) यांचा समावेश आहे.


