जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे पैशाच्या वादातून व्यसनी मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका घालून त्याचा खून केला. ही घटना अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ घडली. यातील आरोपीस रविवारी सकाळी अंतुर्ली परिसरातील एका शेतातून अटक करण्यात आली आहे. जगदीश दामू तायडे (६०), असे खून झालेल्या पित्याचे तर गणेश जगदीश तायडे (२५), असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश यांचा लहान मुलगा गणेश हा व्यसनी असल्यामुळे त्याला नेहमी पैसे पाहिजे असत. आंदलवाडी (ता. रावेर) येथील शेतीचे मला पैसे द्या किंवा बोकड विकून आलेले पैसे द्या, या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश याने डोक्यात लाकडी दांडका घालत मारहाण करून त्यांना जखमी केले. जगदीश यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या रवींद्र तायडे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुक्ताईनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे आणि पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट दिली.


