पारोळा : प्रतिनिधी
न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी तालुक्यातील दळवेल येथे शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विचखेडे गावालगत बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. उद्धव कुवर व त्याचा साथीदार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या व आई निलाबाई हिरे यांच्या नावावर असलेल्या शेतासाठी तीन वर्षापूर्वी शासनाकडून शेडनेट अनुदान मंजूर झाले होते. शासनाकडून दोन शेडनेटसाठी १८ लाख रुपये अनुदान मिळाले होते. ठेकेदार उद्धव कुवर यांना अनुदान मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून दोन महिन्यांसाठी १८ लाख रुपये उसनवार मागितले. त्यानुसार हिरे यांनी १८ लाख रुपये दिले. दोन महिन्यानंतर रकमेचा चेक बँकेत जमा केला असता बाउन्स झाला. याप्रकरणी न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती. २९ रोजी उद्धव कुवर व एकाने गुप्तीसारख्या शस्त्रांनी हिरे यांना मारहाण केली.


