मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली आज मविआचे नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे व अन्य मंडळी देतील, असे भाजपने म्हटले आहे.
महाविकास आघाडी व मनसेने आज मतदार याद्यांमधील कथित घोळ व मतचोरीच्या मुद्यावर सत्याचा मोर्चा काढणार आहे. फॅशन स्ट्रीटहून निघणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या मोर्चाद्वारे हे पक्ष आगामी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीचा शंखनाद करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सत्याचा मोर्चा ही मविआच्या अपयशाची कबुली
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, ‘सत्याचा मोर्चा’ असा नकली चेहरा चढवून महाविकास आघाडी आज आपल्या अपयशाच्या कबुलीचा मोर्चा काढत आहे. आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली आज मविआचे नेते उध्दव ठाकरे, राज ठाकरे व अन्य मंडळी देतील. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार यादीने विजयाचा अनपेक्षित धक्का दिला, ती यादी आता महापालिकेला अजिबात नको, कारण? विधानसभेला पराभव झाला. अशा कारणासाठी मोर्चे काढून आपल्या दुटप्पीपणाचे प्रदर्शन करण्याचे धाडस आज ठाकरे बंधू करणार आहेत.
केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी व मनसेला 3 कळीचे प्रश्नही विचारले आहेत.
मतदान केंद्रावर सकाळी सहापासून मतदार प्रतिनिधी असतात. मतदार येत असताना मतदार प्रतिनिधींच्या समोर मतदार नोंद होऊन त्यांचे मतदान होत असते. विधानसभेला 1 लाख बुथ महाराष्ट्रात होते. आज मोर्चा काढणाऱ्या पक्षांच्या पोलिंग एजंट पैकी 1 टक्का बुथवर म्हणजे 1000 बुथवर तरी मतदानाच्या वेळी आक्षेप घेतले गेले का?
त्या आधी मतदार यादी प्रारूप प्रकाशित होत असते. या मतदार यादी प्रारूपावर आज मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदविले होते?
दुबार मतदार, बोगस मतदार दूर केलेच पाहिजे पण आज मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी लोकसभा निवडणूकीनंतर याबदद्ल आवाज उठविला होता?
‘अपयश ठेवायचे झाकून आणि यादीत बघायचे वाकून’ हा पोरखेळ मतदार ओळखून आहेत. काँग्रेसमध्ये कुणी टिकत नाहीये, शरद पवार गटात कुणी थांबायला तयार नाही, राज ठाकरेंचा यशाचा सूर कधीच हरवलाय आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उध्दव ठाकरेंनी विश्वास गमावलाय. अशा, भरकटलेल्या, हतबल नेत्यांचा हा मोर्चा ‘सत्याचा’ नाही. हा तर अपयशाच्या, नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.


