मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अतिवृष्टी अनुदानावरून सरकारला इशारा देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. आता, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तिथल्या आंदोलकांना काय त्रास होतोय, शेतकरी सगळा नागपूरला बसला आहे आणि ज्यावेळेस अतिटतीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. जेव्हा अतिटतीची वेळ येते तेव्हा आपण खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे म्हणून आम्ही तातडीने नागपूरकडे निघालो. दरम्यान, बच्चू कडू यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली असून उद्या बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. तरी देखील अद्याप आंदोलन सुरू असून कर्जमाफीची तारीख जाहीर नाही केली तर रेल्वे रोको करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, आपण आंदोलन थांबवणार नाही. आपली मागणी आहे कर्जमाफीची. सरकार म्हणत आहे की कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगणार. आपले आंदोलन कशासाठी आहे, तारखेसाठी आहे. कर्जमुक्तीची तारीख पाहिजे. जर सरकारने तारीख दिली नाही तर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचे नाही. आपले आंदोलन बंद पडणार नाही. अजून आपण निर्णय घेतलेला नाही. दोन मंत्री इथे आले, त्यांचे म्हणणे असे आहे की आपले बाकीचे जे मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करू. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आपण रेल्वेवर बसणार. तुमच्या मनात किंतु परंतु असेल तर बोला. आमच्या मागे पोलिसांनी तुम्हाला काही केले तर आम्ही मंत्र्यांच्या घरात जाऊन बसणार. तसेच कोणाच्याही गाड्या अडवू नका, अशी विनंती कडू यांनी आंदोलकांना केली आहे. तसेच आता बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


