मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. राज्यातील राजकीय वातावरणाला साजेशी अशी ही निवडणूक रंगतदार वळण घेत आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकतो, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला आहे. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत राजकीय गोटांतील संघर्ष आणि क्रीडा क्षेत्रातील पारंपरिक नेतृत्व यांच्यातील लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकारणाचा प्रभाव वाढू लागल्याने एमसीएच्या अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमध्ये राजकारण नको, या भूमिकेसह काही सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बुधवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत पवारांना सदस्यांनी स्पष्ट सांगितले की, क्रिकेट हा खेळाडूंचा मंच आहे, आणि त्यामुळे खेळाशी थेट संबंध असणाऱ्या व्यक्तींनाच नेतृत्व द्यावे. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सदस्यांनी एमसीएच्या कामकाजातील राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
शरद पवार यांनीही या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. मी कधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण आणले नाही आणि तीच अपेक्षा आजच्या नेत्यांकडून आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, आत्तापर्यंत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केले नाही. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील क्रिकेटच्या हितासाठी काम करतील. पवारांनी क्रिकेटमधील राजकारणाचे जोड़े बाजूला ठेवावेत, असे सांगत फडणवीसांचे अप्रत्यक्ष कौतुक केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठींबा असल्याचे संकेत मिळाले.
दरम्यान, शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांतील काही नेते अजिंक्य नाईक यांच्या पुनर्निवडीविरोधात असल्याचे दिसत आहे. मंत्री आशिष शेलार आणि प्रताप सरनाईक यांनी नाईक यांच्या उमेदवारीविरोधात आक्षेप नोंदवला आहे. यामुळे, आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गटातील मतभेद उघड होत आहेत. सरनाईक यांच्या मुलाचा प्रवेश या स्पर्धेत झाल्यास, त्याला राजकीय पाठबळ मिळेल का? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या निवडणुकीत सत्ता आणि क्रीडा नेतृत्व यांच्यातील सीमारेषा आणखी धूसर झाल्या आहेत.


