भुसावळ : प्रतिनिधि
तालुक्यातील फेकरी येथील संस्कृती नगर परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडून एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली व सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहिती नुसार, संस्कृती नगरात राहणारे संदीप अशोक वाघ हे रात्री ड्युटीवर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सामानाची उधळण करून रोख २०,००० रुपये तसेच त्यांच्या आई उषाबाई वाघ यांची ५,००० रुपयांची रोकड असा एकूण २५,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
दरम्यान, शेजारी राहणारे सोपान कोळी हे त्या रात्री गावाला गेले असल्याने त्यांच्या घरातील नुकसानीचे प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील किशोर बोरोले यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर हवालदार मनोज उवलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुहेरी घरफोडीनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संस्कृती नगर परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य असते, त्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे दिसून येते. तसेच गवत व झुडुपांची वाढ झाल्याने चोरट्यांना लपण्यासाठीही सोय होते, असे नागरिकांचे मत आहे. ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईट तातडीने बसविण्याची आणि पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.


