


अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मंगरूळ येथील प्रफुल्ल प्रकाश भदाणे (वय ३५) या तरुणाचा मृतदेह संशयितरित्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आला असून या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या तरुणाला तेथील स्थानिक काही जणांनी जबर मारहाण करुन त्याचा खून केल्याचा आरोप मयत तरुणाच्या भावाने केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील प्रफुल्ल प्रकाश भदाणे हा २२ रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेला होता. दरम्यान, प्रफुल्ल भदाणे हा २४ रोजी चंद्रपूरच्या हद्दीत खंबाळा येथे जेवणासाठी थांबला होता. तेथूनच काही वेळाने प्रफुल्ल यांनी त्यांचे भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे यांना फोन केला. या वेळी प्रफुल्ल याने काही लोक मला मारत आहेत आणि मी पळत आहे, असे प्रदीप यांना सांगितले.
तर प्रदीप यांनी त्याला त्या मारणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितले. त्या वेळी प्रदीप भदाणे यांनी त्या मारहाण करणाऱ्यांना विनंती केली की, मी पैसे पाठवून देईन, परंतु तुम्ही प्रफुल्ल याला दवाखान्यात दाखल करा. त्यावर त्यांनी हो म्हटले आणि त्यानंतर फोन बंद झाला. दरम्यान, दोन ते तीन दिवस वाट पाहूनही भाऊ आला नाही, तसेच त्याचा फोनही लागत नाही म्हणून प्रदीप भदाणे यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठून या संदर्भात हरवल्याची खबर देण्यासाठी धाव घेतली. ही माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळताच त्यांनी तातडीने बंद मोबाईलचे लोकेशन काढून त्या भागातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्या वेळी तेथे एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर तेथील पोलिसांनी तेथील काही फोटो पाठवले, तेव्हा मयत व्यक्ती हा प्रफुल्ल भदाणे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, प्रफुल्ल भदाणे यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत. मारहाणीतच प्रफुल्ल भदाणे यांचा मृत्यू झाल्याचा संशय त्यांचे बंधू प्रदीप भदाणे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रफुल्लचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांनी वरोळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, प्रफुल्ल भदाणे यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूरकडे रवाना झाले आहेत


