


जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपयांवर आली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन त्यांनी नवनवीन उच्चांक गाठला. मात्र आता गेल्या आठवड्यापासून चांदीत मोठी घसरण होण्यासह सोन्याचेही भाव कमी-कमी होत आहे. त्यात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) तर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली.
सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपये प्रति किलोवर आली. चांदीचे भाव २५ दिवसांच्या नीचांकीवर आले असून यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर होती. त्यानंतर भाव सतत वाढत गेले होते. मध्यंतरी मोठी भाववाढ झाल्याने भाव स्थिरावण्यासह दलालांनी सोने-चांदीची विक्री अचानक वाढविल्याने भावात घसरण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.


