पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील उंदिरखेडे गावात एका होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या वेब सीरिजमध्ये झळकणार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने उंदिरखेडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चांदवडे हा स्वप्नाळू आणि होतकरू अभिनेता म्हणून ओळखला जात होता. अभिनयाची आवड जोपासत असतानाच तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. कामाच्या व्यापातही तो अभिनय क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी झटत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दोन वेगवेगळ्या वेब सीरिजमध्ये भूमिका मिळाली होती, ज्यामुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि गावात आनंदाचे वातावरण होते.
मात्र, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सचिनच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मोबाईल तपासणीसह त्याच्या मित्रपरिवाराकडून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, उंदिरखेडे गावातील या तरुण अभिनेत्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक माध्यमांवर त्याच्या आठवणींना उजाळा देत मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


