नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येत आहे. याविषयी समाज माध्यमांत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने 2 गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे की, राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर करत आहे. तिचे नृत्य पाहून उपस्थित दर्शक वन्स मोअरी मागणी करत आहेत. व्हिडिओत काही महिला कार्यकर्त्याही दिसून येत आहेत. त्या ही नृत्य सादर करणाऱ्या कार्यकर्तीला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत. पण आता याविषयी सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.


