सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश करण्याची मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. या मागणीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असले तरी, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा मूळ अधिकार हा शासनाकडेच असणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असल्याने, शिक्षण मंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी केलेली जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या समावेशाची मागणी एक नवीन परंपरा सुरू करू शकते. यावर वारकरी संप्रदायाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी 1997 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून दर्शन रांगेतील पहिल्या वारकरी दांपत्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेली ही मागणी शासन स्तरावर आणि मंदिर समितीकडे निर्णयासाठी जाणार आहे.
वास्तविक पाहता, विठ्ठलाचा गाभारा अतिशय लहान असल्याने तेथे मर्यादित लोकांनाच उभे राहता येते आणि यापूर्वी गाभाऱ्यात गर्दी झाल्यामुळे महापूजेला आलेल्या व्हीआयपींना श्वास घेण्यास त्रास झाल्याची घटना घडली होती. आता शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेल्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र जिल्हा परिषदेचे सर्वसामान्य विद्यार्थी महापूजेत सहभागी झाल्यास राज्यभर एक चांगला सामाजिक संदेश जाईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.
विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने यावर्षी कार्तिकीची शासकीय महापूजा नेमकी कोणाच्या हस्ते होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. आता हे स्पष्ट झाले आहे की, विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


