छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी 10 वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे” असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे. संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की, कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आणण्यासाठीची ही भूमिका आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय शिरसाट यांचे हे वक्तव्य रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर समोर आले आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांनी रान पेटवले आहे. आज त्यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरत, संजय शिरसाट यांच्यावर मलिदा गँगचे मास्टरमाईंड अशी टीका केली. तसेच शिरसाटांनी राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा, असे रोहित पवार म्हणालेत.
मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतःला ‘अल्पसंतुष्ट’ माणूस म्हणवून घेत, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे अशा प्रकारचे मला कधीच भूक नव्हती, ना असेल, असे स्पष्ट केले. “मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. जे स्वप्नातही पाहिले नव्हते, ते सर्व अनुभवले आहे. मात्र, वाढते वय माणसाला काही गोष्टी थांबवण्यास भाग पाडते. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का? असा प्रश्न मनात आला आहे. आता थांबले पाहिजे, असा विचार मी मनाशी करत आहे, असे त्यांनी म्हटले.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही. मी आता 64 वर्षांचा आहे. लवकरच मी 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो. मला 2029 पर्यंतचा काळ आहे. 2029 साली मी 69 वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावे याचा विचार तर केलाच पाहिजे ना. राजकारण हा सेवेची संधी असलेला भाग जरी असला, तरी आता माझ्याकडील खाते मोठे आहे. मी चांगले काम करतोय, त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे किंवा माझ्या काही अपेक्षा आहेत असे काही नाही. माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे, असेही ते म्हणाले.
राजकारण दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. त्यामुळे झाले तेवढे पुरे झाले. आता थांबावे असे वाटते. राजकारणात आपले हात पाय चालतात तोपर्यंत काम करावे, कोणी आपण अमृत पिऊन आलो असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला, तर ते अधिक बरे असते, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी आपल्या राजकीय निवृत्ती बाबत भाष्य केले.


