जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून काम नसल्याने वेल्डिंगच्या कामावर गेलेला असताना विजेचा धक्का लागून आवेश अली परवेज अली (२१, रा. उस्मानिया पार्क) याचा मृत्यू झाला. आवेश हा एसी, फ्रीज दुरुस्तीचे काम करायचा, मात्र काम नसल्याने तो वेल्डिंगच्या कामावर गेला होता.
उस्मानिया पार्क परिसरातील आवेश अली या तरुणाचे रेफ्रिजरेशन या ट्रेडमध्ये आयटीआय झाले. तो नियमित एसी, फ्रीज दुरुस्तीचे कामे करायचा. मात्र, तीन दिवस काम नसल्याने तो वेल्डिंग दुकानावर कामासाठी गेला होता. वेल्डिंगचे काम सुरू असताना दुपारी अचानक त्याचा पाय उघड्या वीज वाहक वायरवर पडला व त्याचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे


