मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु असतान आता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी रणनिती तयार केली आहे. पक्षाने 150 हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याचे लक्ष्य ठेवले असून, उर्वरित जागांवर शिवसेना शिंदे गटाशी युतीचा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. भाजपने मुंबईसाठी 150 जागांवर विजयाचे लक्ष्य ठेवताच, शिंदेंनी मध्यरात्री दिल्लीकडे प्रयाण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या दिल्ली भेटीमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.
शिंदेंची ही भेट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठीच असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. शिंदे-भाजप युतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी ही भेट निर्णायक ठरू शकते, असे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला सुमारे 64 ते 75 जागा देण्यास अनुकूल आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी सत्ता असल्याने आता मुंबईत सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईत डबल इंजिन सरकारच्या नावाखाली भाजपने प्रचाराला वेग देण्याची योजना आखली आहे. कार्यकर्त्यांना 150 पारचा नारा देत भाजपने संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यातही सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. याच कारणामुळे सर्वच पक्षांनी मुंबईसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गट या सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना सज्जतेचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या संपर्कामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली असून, या ‘ठाकरे फॅक्टर’मुळे मुंबईच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.


