भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील शिरपूर-कन्हाळा रोड परिसरात राहणाऱ्या अमृत कॉलनी मध्ये एका विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या मुकेश अंभोरे (वय अंदाजे १५ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिचे वडील मुकेश अंभोरे हे मध्य रेल्वे, भुसावळ येथे नोकरीस आहेत. गुरुवारी सायंकाळी पती-पत्नी खरेदीसाठी बाजारात गेले असता घरात दोन्ही मुली होत्या. सुमारे सायंकाळी सात वाजता ते घरी परतल्यानंतर मोठी मुलगी लावण्या हिने घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तत्काळ तिला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही. लावण्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.


