जळगाव : प्रतिनिधी
अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या चार संशयितांना अमळनेर येथे आणत असताना दोन जण बेड्यांसह पसार झाले. ही घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कुन्हे अंडरपास, ता. अमळनेर येथे घडली. दोन दिवसांनंतरही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. शाकीर शाह अरमान शाह (३० रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) आणि अमजद शेख फकीर कुरेशी (३५ रा. अशोक किराणा जवळ मेहरूण, जळगाव) अशी या पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत.
अमळनेर तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून सात गुरे चोरी झाली होती. त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडून सुरू होता. जवखेडे येथे सीसीटीव्हीमध्ये गुरे चोरताना काही जण आढळले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीचा शोध घेतला असता तिचा मालक अकील कादीर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) हा असल्याचे समजले. त्याला बुधवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. त्याने शाकीर शाह अरमान शाह, अमजद शेख फकीर कुरेशी, आफताब आलम शेख रहीम (रा नशिराबाद जळगाव), तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर, जळगाव) यांच्यासोबत अमळनेर तालुक्यात सात आणि पहूर ता. अमळनेर येथे तीन गुरे चोरी केल्याचे कबूल केले. यापैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
या चारही जणांना बुधवारी रोजी रात्री शासकीय वाहनाने अमळनेर येथे आणत असताना त्यातील शाकीर शाह व अमजद शेख हे कुन्हे, ता. अमळनेर येथील अंडरपासमध्ये वाहन हळू होताच दोघे वाहनातून उडी मारून पसार झाले. या पसार झालेल्या दोघा संशयितांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.


